माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधताना मुंबई:शिवसेना चोराला माहीत नाही की, त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावरती दगड मारला आहे. माशांचा डंका आता दाखवण्याची वेळ आली आहे. निवडणूक आयोगाने गुलामी केली आहे. निवृत्त झाल्यावर कदाचित ते कुठले तरी राज्यपाल होतील. सरकारी यंत्रणा गुलाम बनल्या. पूर्वी मोदींचे मुखवटे घालून आले होते. आता बाळासाहेबांचे मुखवटे घालून महाराष्ट्रात यावे लागत आहे. शिवसेना संपवणे शक्य नाही. गद्दारीने मशाल निशाणीसुद्धा काढू शकतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तर निवडणुकीला सामोरे जा: गद्दारीने मशाल निशाणी सुद्धा काढू शकतील. धनुष्यबाण सोडलेले मर्द असतील तर त्याने धनुष्यबाण ठेवून निवडणुकीला समोरे जावे. आम्ही मशाल घेऊन सामोरे जातो. रावणानेसुद्धा धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो पेलवला नाही. शिवसैनिकांची ताकद उभी आहे तोपर्यंत किती गद्दार आले त्यांना गाडून पुरून उरल्याशिवाय शांत राहणार नाही. जेव्हा जेव्हा वाद निर्माण होतात तेव्हा कोणत्याही गटाला मूळ चिन्ह दिले जात नाहीत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
शिवसैनिकांशी संवाद: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. आज अनेक शिवसैनिक वांद्रे कलानगर येथील उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर जमा झाले होते. यावेळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. त्यानंतर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांनी बाहेर येत सर्व शिवसैनिकांशी संवाद साधला.
निवडणूक आयोग भाजपचा गुलाम:उद्धव ठाकरे यांनी बाहेर येऊन त्यांच्या गाडीच्या रुफटॉपवर उभे राहून उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाने ज्या कपट नितीने आपले चिन्ह गद्दार चोरांना दिले, त्याच कपटनीतीने आपले मशाल हे चिन्ह देखील गोठवले जाऊ शकते. पण तुमच्या जोरावर पुन्हा भगवा फडकवण्याची ताकद माझ्यात आहे. शिवसेनेला संपवता येणार नाही. निवडणूक आयोग आज भाजपचा गुलाम झाला आहे. सरकारी यंत्रणा गुलाम बनली आहे. हे चोर धनुष्यबाण हाताळू शकणार नाहीत. हेच शिवधनुष्य रावणाला सुद्धा मिळाले होते. मात्र, त्याला ते सांभाळता आले नाही. तो पडला होता. हा रावण देखील असाच पडेल."
मर्द असाल तर मैदानात या:गदार महाशक्तीच्या जोरावर मशाल निशाणीसुद्धा काढू शकतील. चोरांना आता धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. मी पुन्हा एकदा त्यांना खुले आव्हान देतो की, मर्द असाल तर तुम्हाला जे धनुष्यबाण चिन्ह मिळाले ते चिन्ह घेऊन तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरा. मी मशाल निशाणी घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो.
अभेद्य भिंतीसारखे शिवसैनिक जोपर्यंत...:आजपर्यंत देशाचा राजकीय इतिहास राहिला आहे. जेव्हा जेव्हा वाद निर्माण होतात तेव्हा कोणत्याही गटाला मूळ चिन्ह दिले जात नाही. आता ही परीक्षा आहे. लढाई सुरू झाली आहे. घाबरला आहात का.? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. माझ्या हातात तुम्हाला देण्यासाठी काही नाही. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. अभेद्य भिंतीसारखे शिवसैनिक जोपर्यंत उभे आहेत तोपर्यंत कोणीही शिवसेनेला संपवू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे.
हेही वाचा:Adani Group Forbes Report: रशियन बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अदानींनी तारण ठेवले 'स्टेक्स'.. किंमत ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य