मुंबई - राज्यात सत्तेची समीकरणे बदलताच मुंबई महापालिकेत भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाने थेट पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला आहे. या ठरावावर लवकरच पालिका सभागृहात चर्चा होणार आहे. मात्र, भाजपाच्या अविश्वास ठरवाला विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी या पक्षांची साथ मिळणे कठिण आहे. तसेच हा अविश्वास ठराव मंजूर झाला तरी यावर अंतिम निर्णय नगर विकास विभागाचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री घेणार असल्याने हा अविश्वास ठराव बारगळणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
...म्हणून मुंबई महापालिकेच्या महापौरांवरील अविश्वास ठराव बारगळणार? मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने सहाशे कोटींहून अधिकची रक्कम खर्च केली आहे. या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करुनही पालिका आयुक्त, महापौर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नगरसेवकांना देण्यात येणारा निधीही कमी प्रमाणात दिल्याचा आरोप करत भाजपाने महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची घोषणा भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. त्यासाठी भाजपाने रितसर विशेष सभा आयोजित करण्याची मागणी केली आहे.
मुंबई महापालिकेत एकूण 227 नगरसेवक आहेत. त्यापैकी शिवसेनेचे 97, भाजपाचे 83, काँग्रेसचे 29, राष्ट्रवादीचे 8, समाजवादी पक्षाचे 6, मनसेचा 1 तर एमआयएमचे 2 नगरसेवक आहेत. पालिकेच्या नियमानुसार अविश्वास ठरवावेळी एक मत जास्त पडले तरी हा ठराव मंजूर होऊ शकतो. सत्ताधारी शिवसेनेकडे संख्याबळ जास्त असल्याने भाजपाला इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. इतर पक्षांनी भाजपाच्या बाजूने मतदान केले तरच हा अविश्वास ठराव मंजूर होऊ शकतो. भाजपाने अद्याप पालिकेतील विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी या पक्षांशी चर्चा केलेली नाही. अविश्वास ठरावावर ज्यावेळी पालिका सभागृहात चर्चा होईल त्यावेळी आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी दिली आहे.
महापालिका सभागृहात अविश्वास ठराव मंजूर झाला तरी तो राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. नगर विकास विभागाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. तर मुंबईच्या महापौरही शिवसेनेच्या आहेत. मुख्यमंत्री आपल्याच पक्षाच्या महापौरांना पदावरुन काढतील याची शक्यता कमी आहे. भाजपाने महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणला असला तरी भाजपाने विरोधी पक्षनेते पदावर दावा करुन आणि त्याबाबत उच्च न्यायालयात दाद मागून काँग्रेसला डिवचले आहे. पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष भाजपाला मदत करतील याची शक्यता खूप कमी आहे आणि जरी मदत केली किंवा कोणी भाजपाच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले तरी मुख्यमंत्री याबाबत अखेरचा निर्णय घेणार असल्याने हा अविश्वास ठराव बारगळणार असल्याची चर्चा पालिका मुख्यालयात सुरू आहे.