मुंबई -कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षांपासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी, पंजाबी, बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला, ही मागणी निरर्थक आहे, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे ट्विट करून संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे कराची बेकरीचे नाव बदलण्याच्या विषयावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत कराची स्वीट्स या नावाने असणाऱ्या दुकानाचे नाव बदलावे, अशी शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी मागणी केली होती. या दुकानाच्या मालकाला, दुकानाचे नाव बदला नाहीतर दुकान चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. इशारा मिळाल्यानंतर दुकानदाराने दुकानाचे नाव वृत्तपत्राने झाकले होते.
बेधडक कामासाठी प्रसिद्ध असलेले नांदगावकर यांनी काल (बुधावार) कराची स्वीट्स या दुकानात जाऊन दुकानचालकाला थेट इशारा दिला. मुंबईत आणि महाराष्ट्रात ह्यापुढे कराची नाव चालणार नाही. पाकिस्तानातील कराची म्हणजे नामचीन आतंकवाद्यांचा अड्डा मग त्यांचा महाराष्ट्रात उदो उदो कशाला. मुंबईत राहता मग मुंबईचा अभिमान बाळगा. पाकिस्तान आणि कराचीच्या आठवणी मुंबईत चालणार नाहीत. कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल मुंबईत चालणार नाहीत. १५ दिवसात कराची नावे असलेल्या पाट्या बदला, असे नांदगावकर यांनी सांगितले होते.
काय म्हणाले संजय निरुपम...
मुंबईमध्ये असणाऱ्या कराची या दुकानाच्या नावावरून नवा वाद उभा राहिला आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या नावाला विरोध केला आहे. या प्रकरणात आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील उडी घेतली आहे. कराची स्वीट्सचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना सत्य कधी कळणार? असे संजय निरुपम यांनी सांगितलं. तसेच या दुकानाला संरक्षण देण्याचीही मागणी निरुपम यांनी केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले....
कराची बेकरी आणि कराची स्वीट्स 60 वर्षांपासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
कोण आहेत नितीन नांदगावकर
नितीन नांदगावकर राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजकीय सुरुवात करणारे नांदगावकर आता शिवसेनेत आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. कोविड संकटातही त्यांनी अनेकांना मदत केली होती. रुग्णाकडून जास्त पैसे आकारणाऱ्या रुग्णालयाविरोधात त्यांनी मोहीम उघडली होती. नांदगावकर कायमच फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत असतात.
शिवसेनेचे नितीन नांदगावकर दुकानदाराशी बोलताना...
मनसेची कायदेशीर लढाई
मुंबईत कराची स्वीट्स नावाने दुकानं सुरू असल्याचे चर्चा समोर आल्यानंतर मनसेने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. देशाचा शत्रू असलेल्या पाकिस्तानमधील कराची या नावाने बहुचर्चित 'कराची स्वीट्स' या नावाचा आधार घेऊन मिठाईचे दुकान सुरू केले आहे. त्यामुळे भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेच पोहोचून हा व्यवसाय केला जात आहे', असे मनसेचे नेते हाजी सैफ शेख यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर चर्चा
फाळणीच्या आधीपासूनच दुकान आहे. त्यामुळे कराची नाव आहे. हे दुकान हिंदूचे आहे. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या हिंदूचे आहे, असे मत नेटीझन अभिराम यांनी व्यक्त केले आहे.
मनसेला काही काम धंदा नाही. उठसूट दुकान फोड हे फोड ते फोड. प्रत्येक शहराची देशाची खाद्याची काही विशिष्ट ओळख असते. त्याच नावाने पदार्थ विकले जातात. बाहेर देशात पण भारतीय शहराच्या नावाने दुकान आहेत. त्यांनी पण तसेच केले तर आणि राहिला प्रश्न पाकिस्तानचा. या देशातून भारतामधे खुप वस्तूंची, भाज्यांची आयात निर्यात होते. देशप्रेम मराठी अस्मिता याचा नावाने लोकाना मूर्ख बनवायचे धंदे आहेत, असे मत अनिकेत गिरी यांनी व्यक्त केले आहे.
वृत्तपत्राने झाकले नाव
कराची या नावावरून वाद झाल्यानंतर दुकान मालकाने हे नाव वृत्तपत्राने झाकले आहे. याविषयी या दुकानदाराशी संपर्क साधला असता त्यांनी विषयी बोलणं टाळले आहे.
हेही वाचा -वीज बिल प्रकरण : लाथो के भूत बातों से नही मानते…; मनसे नेत्याचा सरकारला इशारा
हेही वाचा -लग्नास दिला नकार; आरोपीने महिलेच्या नावे पत्र लिहित सौदीचा दूतावास बॉम्बने उडवण्याची दिली धमकी