मुंबई : कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण लवकरच जगासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी काही ऑडिओ क्लिप फोनमध्ये रेकॉर्ड केल्या होत्या. त्यातील एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यानुसार माझा स्टुडिओ गिळण्याचा प्रयत्न आहे, असे ते बोलल्याची एक क्लिप ही व्हायरल होत आहे. आता ते नेमके कोण आहेत, जे त्यांचा स्टुडिओ गिळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांच्यापुढे आहे. दरम्यान बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याच दरम्यान नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लीपमधील एक-एक माहिती बाहेर आली आहे. यात नितीन देसाई यांनी रशेष शाहसह इतर तीनजणांवर गंभीर आरोप केले आहेत.
नितीन देसाईंची ऑडिओ क्लिप : एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या करण्याआधी नितीन देसाईंनी 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. या क्लिप त्यांनी आपल्या परिवारातील सदस्य मित्र आणि वकिलांना पाठवल्या होत्या. पोलिसांनी या क्लिप्स मिळवल्या असून त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या. त्यातील एका क्लिपमध्ये नितीन देसाई यांनी रशेष शहा, स्मित शहा, केयर मेहता, आर. के. बन्सल यांनी माझा स्टुडिओ गिळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
काय आहे क्लिप : रशेष शाह हा गोडबोल्या असून त्याने छोट्या-मोठ्या उद्योजकांसाठी कष्टाने बनवलेला माझा स्टुडिओ गिळण्याचे काम केले. त्याला 100 फोन केले, परंतु तो फोन उचलत नाही. ईओडब्ल्यू (EOW), एनसीएलटी (NCLT),डीआरटी(DRT) यांच्याकडून प्रचंड छळ झाला. माझ्याकडे दोन-तीन गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी तयार होते. पण मला सहाकार्य केले नाही. माझ्यावर डबल टिबल किमतीचा बोजा टाकून दबाव टाकला. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने प्रेशर आणले. मी दिलेल्या गोष्टी मान्य करीत नाहीत. स्मित शाह, केयर मेहता, आर. के. बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटण्याचे, माझी नाचक्की करुन मला घेरण्याचे काम केले आहे. या लोकांनी माझी वाट लावली आहे. मला पैशांच्या बाबतीत धमक्या देऊन नराधमांनी माझ्यावर दबाव टाकला. माझे सोन्यासारखे ऑफिस विकायला लावले. एका मराठी कलाकाराला जिवे मारण्याचे काम या नराधमांकडून होत आहे. कारस्थान करुन, दडपून टाकून मला संपविले. माझ्या मनात नसतानाही त्यांनी हे करायला भाग पाडले आहे.