नितेश राणे यांची संजय राऊतांना धमकी मुंबई :राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. परंतु आजही सत्ताधारी, विरोधक अशा दोन्ही बाजूंनी होणारे आरोप प्रत्यारोप, हीन भाषेचा वापर होत आहे. त्यामुळे सध्या राजकारणाचा दर्जा फारच खालावत चालल्याचे चित्र वारंवार पाहायला भेटत आहे. त्यातच आज विधानसभेमध्ये बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना खुली धमकी दिली आहे.
राऊत यांच्यावर कारवाई करा :शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटले आहे. यावरून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात गदारोळ पाहायला भेटला. त्यातच संजय राऊत यांच्यावर हक्क भंग आणण्याची मागणी शिंदे गटाचे आमदार भरत भोगावले व भाजपचे आमदार अतुल भातखलकर यांनी केली. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर विशेष करून शिंदे गट व भाजपचे आमदार मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले व त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
नंतर ते दिसणार नाहीत? :खासदार संजय राऊत यांच्यावर बोलत असताना भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. संजय राऊत कोण आहेत? त्यांना रोज का ऐकावं लागतं. त्यांनी पत्रकार असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा भांडण लावल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला. त्याच बरोबर संजय राऊत यांची दहा मिनिटांसाठी सुरक्षा काढा त्यानंतर ते दिसणार नाहीत अशा पद्धतीची मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे करत संजय राऊत यांना एक प्रकारे धमकी वजा इशारा दिला आहे.
राऊत, यांना आमच्या ताब्यात द्या? :विधानभवनात पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत विधी मंडळ चोर आहे असे म्हटले आहे. संजय राऊत या माणसाकडून विधी मंडळाचा वारंवार अपमान होतो आहे. त्याला खासदार कोणी बनवले. विधिमंडळाचा अपमान केला असून त्याची धिंड काढली पाहिजे. महाराष्ट्रात राहून अपमान करतो आहे म्हणून विधिमंडळाने त्याच्यावर हक्क भंगाची कारवाई केली पाहिजे. नाहीतर आमचा ताब्यात दिले पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीने पाहू काय करायचे ते. राज्य सरकारने त्याची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली पाहिजे असेही नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा -MH Budget Session 2023 : संजय राऊतांच्या विधानाने गाजला अधिवेशनाचा तिसरा दिवस; हक्कभंग समिती राऊतांना सुनावणीसाठी बोलावणार