मुंबई :धार्मिक भावना भडकावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाने नितेश राणेंना दिलासा दिला आहे. न्यायालयाने प्रतिवादी पक्षाला नोटीस पाठवली असून या संदर्भात ८ आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
नितेश राणेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल :भाजपा नेते नितेश राणे यांनी दोन धर्मांमध्ये भावना भडकवणारे वक्तव्य केल्यानंतर अरविंद कटरनवरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली होती. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पनवेल न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी दिले होते. त्या आदेशाच्या आधारे पोलिसांनी नितेश राणे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्ह्यांची तक्रार दाखल करणारे वकील अमित कातरनवरे म्हणाले की, 'भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 153B, 295 आणि ॲट्रॉसिटी कायदा 1989 च्या कलम 3 अन्वये, राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.