मुंबई : काल कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. या निकालानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी, तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी उत्तर देत संजय राऊत यांना मुख्यमंत्री बनायचं होतं व या कारणास्तव त्यांनी महाविकास आघाडी सरकार पडले, असा आरोप केला आहे.
'समोरासमोर होऊन जाऊ दे' : या वेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर डोळा होता. त्यांना मुख्यमंत्री बनायचे होते. या कारणाने त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडले, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. कर्नाटक निवडणुकीतील पराभवावरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा व भाजपवर निशाणा साधला आहे. त्या टीकेला नितेश राणेंनी उत्तर दिले आहे. नितेश राणे म्हणाले की, राहुल नार्वेकर यांनी अध्यक्ष म्हणून न्याय द्यावा अशी उद्धव ठाकरे गटाला अपेक्षा आहे. तर दुसरीकडे त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. या निमित्ताने नितेश राणे म्हणाले आहेत की, संजय राऊत यांनी स्वत:च संरक्षण बाजूला ठेवावं. मी माझं संरक्षण सुद्धा बाजूला ठेवतो एकदा समोरासमोर होऊन जाऊ दे. मग बघू कोण कोणाला धडा शिकवतो ते? असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत 90 दिवसात जेलमध्ये जातील असेही नितेश राणे म्हणाले आहेत. तसेच जर संजय राऊतांनी त्यांची जीभ जागेवर ठेवली नाही तर त्यांचे पाय हातात देऊ, असा धमकी वजा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.
'बेळगावातील पराभवाला संजय राऊत जबाबदार' :तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी इतर पक्षातील नेत्यांना विचारात न घेता राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला. यावर नितेश राणे म्हणाले की, नाना पटोले यांनी सर्व नेत्यांच्या सहमतीने विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ज्या वेळी त्यांनी हा राजीनामा दिला, तेव्हा याबाबत सर्व नेत्यांना अवगत करण्याचं काम त्यांनी संजय राऊत यांच्याकडे दिलं होत. परंतु संजय राऊत यांनी हे कुणालाही सांगितले नाही, ही वस्तुस्थिती असल्याचंही नितेश राणे यांनी सांगितलं आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला संजय राऊत गेले होते. तेव्हा या चपट्या पायाच्या गद्दाराला बोलावू नका, अशी विनंती तेथील जनतेला केल्याचं नितेश राणेंनी सांगितलं आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार पडले असून सर्व ठिकाणी भाजप व काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. मग बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार केला, तर त्यात किती मते मिळाली. बेळगावात उबाठाचे उमेदवार कृष्णाजी पुंडलिक पाटील यांना फक्त 979 मते मिळाली असून तेथे नोटाला 1230 मते मिळाली आहेत. याला जबाबदार संजय राऊत असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते, संजय राऊत? : संजय राऊत यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून लवकरात लवकर निर्णय दिला पाहिजे, असे सांगितले आहे. जर तसे झाले नाही तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भविष्यात रस्त्यावर फिरणं अवघड होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पक्षांतरांचा इतिहास फार मोठा असून तो त्यांचा छंद असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत नसून त्यांनी फक्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निदर्शनाचे पालन करावं, नाहीतर महाराष्ट्र काय आहे, हे आम्हाला दाखवावे लागेल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा :
- Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक; शरद पवारांच्या निवासस्थानी ठरणार रणनीती
- Amol Kolhe New : फ्री पासकरिता पोलिसांची आयोजकांना धमकी, अमोल कोल्हेंनी भर कार्यक्रमात प्रेक्षकांना सांगितली माहिती
- Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray: 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना', स्वत:च्या जळत्या घराकडे लक्ष द्या- मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला