मुंबई -भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सैन्याचा वापर होत नाही. मात्र, पाकिस्तानातील बालकोट इथल्या सर्जिकल स्टाईक बाबत बोलण्याचा आग्रह जनतेतूनच होत असल्याचे देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. मुंबई भाजपच्या कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून विकास कामांच्या ऐवजी सैन्याच्या शौर्याचे भांडवल करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता, सीतारामन यांनी ही प्रतिक्रिया दिली.
देशातल्या अनेक भागात मोदी सरकारच्या ५ वर्षांच्या विकास कामांवर आम्ही प्रचार करत आहोत. मात्र, अनेकदा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर, सर्जिकल स्ट्राईकवर नेत्यांनी बोलावे अशा चिठ्या जनतेतूनच येत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने काहीही ठोस भूमिका घेतली नाही. दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले नाही. मोदी सरकारने सरकारने पुलवामा इथल्या शाहिद सैनिकांचा बदला घेत थेट पाकिस्तनात हल्ला केला. ही या सरकारची निर्णय क्षमता आहे. काँग्रेसला निर्णयक्षमतेवर बोललेले रुचत नाही, असेही त्या म्हणाल्या. आम्ही गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांबाबत जनतेत प्रचार करतोय. पण आता जनताच राष्ट्रीय सुरक्षे बाबत अधिक जागरूक झाली असून त्यांना राजकीय पक्षांनी सुरक्षेबाबत आश्वस्त करावे, अशी अपेक्षा आहे. असेही सीतारामन यांनी सांगितले.