मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलल्या कारणाने आता यावरून सर्वपक्षीय राजकारण चांगलेच तापले आहेत. सरकार निवडणुकीला घाबरत असून यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तर नाईट लाईफ चालवण्यासाठी यांना निवडणुका हव्या आहेत, असा थेट आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर लगावला आहे. मुंबईतील आपल्या निवासस्थानी आज (शुक्रवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डरपोक कोण हे येत्या काळात कळेल :याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले आहेत की, संजय राऊत म्हणतात, भाजपा डरपोक आहे, निवडणुका घेण्यास घाबरत आहे. निवडणुकीत हार होईल म्हणून निवडणुका घेत नाही; पण मला सांगायचे आहे की, डरपोक कोण आहे, हे येत्या काळात त्यांना कळेल. तसेच आज सकाळी आदित्य ठाकरेही म्हणालेत की, आम्ही सिनेटची तयारीही केली होती; परंतु यांना नाईट लाईफ गँगच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सिनेटची निवडणूक घ्यायची आहे. अशा पद्धतीचा थेट आरोप नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.
सेक्युलर झालो असा खुलासा करा :नितेश राणे पुढे म्हणाले की, एकीकडे हे विद्यार्थी सिनेट निवडणुका लढतात, तर दुसरीकडे हेच विद्यार्थी नाईट लाइफ टोळ्यांचे शिकार होत आहेत. संजय राऊत आम्हाला डरपोक म्हणत आहेत. पण डरपोकची व्याख्या काय आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवू असे सांगत, सुजित पाटकरांशी तुमचा काय संबंध? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. कोविड काळात मुंबईत राहणाऱ्या कामगारांना इतर राज्यात पाठवण्याचे काम केंद्र सरकारकडून करण्यात आले; पण मजुरांना खाण्यासाठी जी खिचडी होती त्यातही भ्रष्टाचार झाला आहे. ज्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे वर्षानुवर्षे हिंदुत्वाचा आवाज बुलंद करायचे, आज त्याच मातोश्रीवरून ते काँग्रेस नेत्यांसोबत सहलीची तयारी करत आहेत. ज्या मातोश्रीवर तुम्ही काँग्रेस नेत्यांसोबत बसता, तिथे गोमूत्र शिंपडणार का? किंवा आपण सेक्युलर झालो आहोत, याचा खुलासा करा असा घणाघातही नितेश राणे यांनी केला आहे.