मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील जामिनावर सुटलेल्या आरोपींनी यापुढे आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहणे अनिवार्य असल्याचा निर्वाळा एनआयए न्यायालयाने दिला आहे. न्यायालयात एखाद्या तारखेला आरोपी गैरहजर राहणार असेल तर त्यासाठी आरोपीकडून सबळ कारण न्यायालयाला सांगावे लागणार आहे. विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने बजावले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट : साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहीत यांना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
नेहमीच्या सुनावणीवेळी जामिनावर सुटलेल्या आरोपींचे वकील त्यांचे अशील आजारी असल्याचे न्यायालयाला सांगत होते. आरोपी सुनावणीस गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती विनोद पाडाळकर यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहीरकर आणि संदिप डांगे यांच्याविरोधात खटला सुरू आहे. यापैकी साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहीत हे सध्या विशेष न्यायालयाच्या सुनावणीस गैरहजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यातीलच एका आरोपीने याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले होते. नेहमीच्या सुनावणीवेळी जामिनावर सुटलेल्या आरोपींचे वकील त्यांचे अशील आजारी असल्याचे न्यायालयाला सांगत होते. आरोपी सुनावणीस गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे.