मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भागातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसीसह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, बहृन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व महापालिकांचे आयुक्त, कोकण विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. या अतिवृष्टीच्या काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना कळवण्यात यावी, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
सर्व जिल्हे आणि महापालिकाही सज्ज
याच बैठकीत विभागातील इतर महानगरपालिका आयुक्त, जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीच्या काळात केलेल्या सर्व उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. सर्व यंत्रणा सज्ज आणि सतर्क केल्याचे सांगतांना त्यांनी धोकादायक इमारती, लो लाइन एरिया, दरडग्रस्त भाग आणि किनारपट्टीच्या ज्या भागात लोकांना स्थलांतरीत करण्याची गरज लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या उपाययोजना, कोविड रुग्णालयांची काळजी, ऑक्सिजन, डिझेलचा साठा, जनरेटर्सची व्यवस्था, दरडग्रस्त भागातील, धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आदी कामांची माहितीही दिली आहे.
हेही वाचा-'चांग' घर, जे हत्तीच्या हल्ल्यापासून गावकऱ्यांचा बचाव करतं