मुंबई- राज्यातचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे आपल्या राज्यपाल पदाची शपथ ही मराठीतून घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रज्योग यांनी राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासह राज्यातील अनेक आमदार आणि उत्तराखंड येथील डझनहून अधिक मंत्री, आमदार, उद्योगपती या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राज्यपल भगत सिंह कोश्यारी शपथ घेताना
नुकताच माजी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती केली होती. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता मुंबईतील राजभवन येथे शपथ सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावणात पार पडला. शपथविधीच्या या सोहळयाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आपल्या ताफ्यासह उपस्थित राहीले, असता त्यांचे आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रज्योग यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. या सोहळ्याला मुंबई पोलीसांसह विविध दलांचे बँड पथक आणि विविध पथकांचे प्रमुख, मुंबई पोलीस आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव आदी उपस्थित होते.
हेही वाचा-देशातील पहिली इलेक्ट्रिकल बस 'शिवाई' एसटीच्या ताफ्यात दाखल
या सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर शपथ मराठीतून घेत असताना राज्यपाल महोदयांनी घटनेचे संरक्षण करीत स्वतःला महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी झोकून देईल, असे म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पदाची शपथ घेतली. यावेळी उपस्थितांमध्ये जोरदार टाळ्यांच्या कडकडटात त्यांचे स्वागत केले. तर नौसेनेच्या बँड पथकासह मुंबई पोलीसांच्या पथकांनीही सलामी दिली.
असा आहे परिचय-
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे निष्ठावान स्वंयसेवक भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म १७ जून १९४२ झाला. अल्मोडा महाविद्यालय येथे शिकत असताना विद्यार्थी संघटनेचे महासचिव म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी उत्तरप्रदेश मधील एटा येथे काही काळ अध्यापनाचे कार्य केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे निष्ठावान स्वंयसेवक असलेल्या कोश्यारी यांना आणिबाणीला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत तुरुंगवास भोगावा लागला. सन १९९७ साली ते उत्तर प्रदेश विधान परिषदेवर निवडून गेले. उत्तराखंड राज्याच्या निर्मिती नंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते उर्जा, पाटबंधारे, न्याय व विधी मंडळ कामकाज मंत्री झाले. सन 2001 साली ते उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री झाले. सन २००२ ते २००७ या कालावधीमध्ये ते उत्तराखंड राज्य विधानसभेमध्ये विरोधीपक्ष नेते होते.
सन २००८ साली कोश्यारी उत्तराखंड राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले. ते भारतीय जनता पक्षाचे आखिल भारतीय उपाध्यक्ष तसेच उत्तराखंड राज्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत. सन २०१४ साली ते नैनिताल-उधमसिंगनगर लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी उत्तराखंड राज्यातील टिहरी धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी अथक प्रयत्न केले. उत्तराखंड मधील पिथोरगड येथुन प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘पर्वत पियुष’ या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक राहिले आहेत. त्यांची दोन पुस्तके ‘उत्तरांचल प्रदेश क्यो?’ आणि ‘ उत्तरांचल: संघर्ष एवं समाधान’ प्रकाशित झाली आहेत. दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.