महाराष्ट्र

maharashtra

Ardhendu Bose passed away : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे अर्धेंदू बोस यांचे निधन

By

Published : Aug 8, 2023, 12:11 PM IST

Updated : Aug 8, 2023, 12:36 PM IST

थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे अर्धेंदू बोस यांचे निधन झाले. मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

अर्धेंदू बोस
अर्धेंदू बोस

मुंबई - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे अर्धेंदू बोस यांचे निधन झाले आहे. एकेकाळचे ते मॉडेल आणि अभिनेते म्हणूनही गाजले होते. अर्धेंदू बोस यांचे काल दि. ७ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये त्यांच्या घरीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अर्धेंदू बोस यांनी, मेरा यार मेरा दुश्मन, कौन? कैसे?, विषकन्या, आखरी बाजी, कोब्रा, शिंगोरा अशा काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते.

बोस यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असून अर्धेंदू बोस यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या पत्नी केरमीन बोस यांनी दिली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे कार्य अमर आहे. त्याचबरोबर अर्धेंदू बोस यांनीही स्वातंत्र्य लढ्यात त्यांना काही हातभार लावला होता, असे त्यांच्या पत्नी केरमीन बोस यांनी सांगितले. त्यांच्या तसेच त्यांचे काका, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्धेंदू बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे धाकटे भाऊ शैलेशचंद्र बोस यांचा मुलगा होते. त्यांनी मॉडिलिंगच्या व्यवसायात सुरुवातीपासूनच करियर केले होते. अर्धेंदू बोस हे व्यावसायिक मॉडेल म्हणून अनेक वर्षे बॉम्बे डाईंग या ब्रँडसाठी मॉडेलिंग करत होते. त्यांनी काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यामध्ये विषकन्या, आखरी बाजी, कोब्रा हे चित्रपट गाजले होते.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल अर्धेंदू बोस यांना आत्मियता होती. त्यांच्या संदर्भातील ६४ फाईल्स सरकारने खुल्या केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी इतरही फाईल खुल्या कराव्यात अशी अपेक्षा अर्धेंदू बोस यांनी व्यक्त केली होती. बोस यांच्यासंदर्भातील फाईल खुल्या केल्याने त्यांच्यासंदर्भातील अनेक गूढ उकलली जातील अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली होती. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होऊनही ते दूर का राहिले याचेही उत्तर त्यामध्ये मिळेल असे अर्धेंदू यांना वाटले होते. अर्धेंदू बोस यांच्यामागे त्यांची पत्नी केरमीन बोस तसेच एक मुलगा नेदल बोस आहेत.

Last Updated : Aug 8, 2023, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details