मुंबई - मुंबईत धुमधडाक्यात साजरा केला जाणारा गणेशोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेले गणेश विसर्जन, आज पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होते. यादरम्यान, 28 हजार 293 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत पहाटे तीन वाजेपर्यंत 28 हजार 293 गणेश मूर्तींचे विसर्जन
यंदा मुंबईमधील गणेश भक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याला प्राधान्य दिले होते. कृत्रिम तलावासोबतच पालिकेने विभागात वाहनांवर गणेश मूर्ती संकलन केंद्र सुरू करून मूर्ती गोळा केल्या होत्या. या मूर्तींचे नंतर पालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून विसर्जन करण्यात आले.
मुंबईत पहाटे 3 वाजेपर्यंत 28 हजार 293 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात 3817 सार्वजनिक, तर 24476 घरगुती गणेश मूर्तींचा समावेश आहे. एकूण 28 हजार 293 गणेश मूर्तींपैकी 13 हजार 742 गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. कृत्रिम तलावात 2051 सार्वजनिक, तर 11691 घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मुंबईत यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने पालिकेने भाविकांना समुद्रात जाऊन विसर्जन करण्यास बंदी घातली होती. विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये. तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पालिका कर्मचाऱ्यांकडे मूर्ती सुपूर्द केल्यावर पालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून विसर्जन केले जात होते. यामुळे मुंबईत यावर्षी विसर्जनादरम्यान पाण्यात बुडून मृत्यू होण्याची कोणतीही घटना घडलेली नाही.
मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील 70 नैसर्गिक स्थळी गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने आपल्या 24 विभाग कार्यालयाच्या हद्दीत 168 कृत्रिम तलाव उभारले होते. या तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेने केले होते.