मुंबई :भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमध्ये सत्ता गेल्यानंतर मात्र धुसफुस पाहायला मिळते आहे. वास्तविक आघाडी सत्तेत असतानाही सत्तेवर मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे होते, तरीही सर्वात जास्त पगडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दिसून येत होता, असे राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी म्हणटले आहे. सर्वाधिक निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याची तक्रार अगदी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षही करत होता. राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळवत शिवसेनेच्या मतदार संघात कामे करून आपले पाय अधिक मजबूत करीत असल्याबाबत शिवसेनेच्या आमदारांनीही वेळोवेळी तक्रार केली होती. सत्ता, किमान समान कार्यक्रमावर आधारित आघाडीचे सरकार टिकून होते. सत्ता गेल्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अधिक झपाट्याने आपली संघटना विस्तार करताना दिसत असवल्याचे मत अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले आहे. त्या तुलनेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मागे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेला राष्ट्रवादी आता आपल्या भूमिका बदलताना दिसत आहे.
जेपीसी, पंतप्रधानांच्या शिक्षणाबाबत बदलली भूमिका :अदानी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी मवाळ भूमिका घेतली. यापूर्वीही अनेक उद्योगपतींवर असे प्रसंग आले होते असे जोशी म्हणाले. मात्र, उद्योगपतींना लक्ष्य करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस, शिवसेनेच्या विरुद्ध भूमिका घेतली. त्याचप्रमाणे या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जर संसदीय समितीमध्ये योग्य निकाल मिळणार नसेल, तर अशा समितीची गरज नसल्याचे सांगत शरद पवार यांची भूमिका स्पष्ट केली. तर पंतप्रधानांच्या पदवीबाबत बोलताना एखादा व्यक्ती पदवीच्या जोरावर निवडून येत नाही. जनतेतील प्रतिमा, कामाच्या जोरावर तो निवडून येतो. मात्र, जर तो निवडून आला असेल आणि त्याच्या पदवीबद्दल काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नांचीही उत्तरे त्यांनी दिली पाहिजेत. त्याचीही चिकित्सा झाली पाहिजे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिका काहीश्या मवाळ होताना दिसत आहेत असे मत अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले आहे.