बीड - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठाकून भाजप आणि सेनेमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. राष्ट्रवादीचे राज्यातील अनेक बडे नेते पक्षांतर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बीड जिल्हा सुरक्षीत वाटत असावा. त्यामुळेच पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराची सुरुवात बीड जिल्ह्यातून करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीडमध्ये फुटणार राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ, पक्ष पडझडीच्या काळात पवारच मैदानात - बीडमध्ये फुटणार राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठाकून भाजप आणि सेनेमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बीड जिल्हा सुरक्षीत वाटत असावा. त्यामुळेच पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराची सुरुवात बीड जिल्ह्यातून करण्याचा निर्णय घेतला आहे.
17 सप्टेंबरपासून ( मंगळवार) पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. 17 तारखेला ते सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर 18 तारखेला पवार हे बीड जिल्ह्यात मुक्कामी असणार आहेत. यापूर्वी अनेक वेळा शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाडा शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड अत्यंत वेगाने होत आहे. पक्षातील दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये जात आहेत. या सगळ्या परिस्थितीनंतर खचून न जाता शरद पवार यांनी मात्र, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने दौरा सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात ते मराठवाड्यातील बीड या जिल्ह्याला सर्वात अगोदर भेट देणार आहेत. त्यानंतर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये मुक्काम करून कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.
जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघाचा घेणार आढावा-
18 सप्टेंबर ( मंगळवार) रोजी पवार बीडमध्ये मुक्काम करून जिल्ह्यातील ६ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची रीतसर घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. असे असताना शरद पवार यांनी मात्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. मुक्कामादरम्यान शरद पवार हे राष्ट्रवादीच्या जुन्या आणि नव्या लोकांना भेटून कामाला लागण्याबाबत सूचना देणार आहेत. आगामी विधानसभेत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.