मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. शनिवारपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. मात्र मुंबई शहर आणि उपनगरात पहिल्याच पावसामुळे मुंबईकरांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक सखल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. मुंबईत यावर्षी पाणी तुंबणार नाही, अशा वल्गना करणाऱ्यांची बोलती पहिल्या पावसानेच बंद केली आहे. पावसामुळे तुंबलेल्या मुंबईच्या स्थितीवर मुंबईतील भाजप नेते गप्प का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
'मुंबईतील भाजपाचे नेते गप्प का?' :भाजपवरटीका करतानाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, 'काल मुंबईत मान्सून दाखल झाला. शनिवारी झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबई आणि उपनगराच्या विविध भागात पाणी साचले आहे. सगळीकडे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन कोलमडल्याचे दृश्य सर्व मुंबईकरांनी बघितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना वारंवार मुंबईच्या संदर्भात कुठल्याही ठोस उपयोजना केल्या नाही म्हणून टीका होत होती. नुकताच मुंबई महानगरपालिकेने नालेसफाईचा दावा केला होता. नालेसफाई कामासाठी किती पैसे खर्च केले याबाबतची माहिती दिली होती. यावर्षी मुंबई पाण्याखाली जाणार नाही, असे वारंवार सांगितले जात होते. मात्र पहिल्याच पावसामुळे मुंबईत पाणी तुंबले. आता मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे नेते या प्रश्नावर गप्प का, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारत आहे.'