मुंबई Sharad Pawar : राज्यातील राजकारणामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अपात्रतेवरून एका बाजूला राजकारण तापलं असताना, दुसऱ्या बाजूला दोन्ही पक्षातील नेते सामाजिक कार्यात व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान (Sharad Pawar Inspire Fellowship) करण्यात आली.
अस्वस्थ झालो होतो : कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकीय आठवणींना उजाळा देत, ब्राझीलमधून अन्नधान्य आयात करण्याबाबत आठवण सांगितली. आपला देश स्वयंभू बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आपल्या देशातील कृषी क्षेत्रात अनेक बदल घडतं आहेत. आजच्या घडीला आपण आपली भूक भागवत इतर देशांना अन्नधान्याचा पुरवठा करतोय. जेंव्हा देशाचा कृषिमंत्री म्हणून मी जबाबदारी स्वीकारली तेंव्हा माझ्याकडे पहिली फाइल आली ती ब्राझील देशामधून अन्नधान्य आयात करण्याबाबत. आपण ती फाईल पाहून अस्वस्थ झाल्याची आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. तेव्हा ठरलं की, ही परिस्थिती बदलायला हवी. हे चित्र बदलण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. त्यानंतरच्या पुढच्या पाच ते सहा वर्षात सगळं चित्र बदलून गेल्याचं त्यांनी सांगितलं. आज अन्नधान्याच्या क्षेत्रात आपला देश स्वयंपूर्ण झाल्याचंही शरद पवार यावेळी म्हणाले.