पुणे Supriya Sule vs Ajit Pawar : अजित पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अन्य खासदारांवर कारवाई करुन त्यांचं सदस्यत्व रद्द करावं, अशी याचिका दाखल केली. परंतु यातून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, आम्ही प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाईचं पत्र दिलं आहे. मात्र आमच्या खासदारांच्या विरोधात कारवाईचं कारण काय आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांना अपात्र करण्याचं कारण काय, हे सांगितलं पाहिजे, असंही यावेळी सुळे म्हणाल्या.
अमोल कोल्हे अजित पवार भेटल्याचं माहिती नाही : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी अजित पवार गटानं खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी भेटले. मात्र "या भेटीची आपल्याला माहिती नाही" असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. "राज्यसभेत आमचे चार खासदार आहेत. मणिपूरमध्ये महिला अत्याचार झाले. तेव्हा आम्ही विरोध केला. पण प्रफुल पटेल यांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजुनं निर्णय घेतला. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात खासदारकी रद्द करण्याची मागणी जुलै महिन्यातच केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.
सुनिल तटकरे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी : लोकसभेत सुनील तटकरे यांच्या विरोधात आम्ही पहिल्याच दिवशी खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांच्या शपथविधीला पूर्ण सपोर्ट केला. त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून निर्णय घेतला. म्हणून आम्ही त्याची खासदारकी रद्द मागणी केली. या लोकांनी महिलांच्या विरोधात आणि आमच्या धोरणाच्या विरोधात मतदान केलं आहे. त्यांच्या विरोधात आम्ही अध्यक्षांना पत्र दिलं आहे. तसेच महिला धोरण वेळी आम्ही सगळ्यांनी एकत्रित मतदान केलं. त्यावेळीही सुनील तटकरे हजर नव्हते. त्यामुळे आमच्या पक्ष धोरणाविरुद्ध मतदान केलं असेल, तर त्यांची खासदार की रद्द करा अशी मागणी केली होती. आम्ही काहीही सिलेक्टीव्ह केलेलं नाही. त्यांनी आमच्या खासदारांचं सदस्यत्व का रद्द करण्याची मागणी केली, याबाबत माहिती नाही" असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.