मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यंमत्रीपदाची शपथ घेऊन काल मोठा राजकीय बाँब फोडला. त्यानंतर राज्यातील राजकारणाला पुन्हा एकदा मोठी गती आल्याचे दिसून येत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये त्यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रीतीसंगमावर भेट दिली. आज गुरु पौर्णिमा असल्याने गुरुंना अभिवादन करण्यासाठी शरद पवार कराडला आले होते.
पारावर उभे राहून भाषण -कराडमध्ये शरद पवार यांनी व्यासपीठ उभे असतानाही त्यावरुन भाषण न करता पारावर उभे राहून भाषण दिले. यावेळी त्यांनी तरुण नेतांनी नाउमेद होऊन चालणार नाही असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा आपणच असल्याचे पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते. आज त्याचाच प्रत्यय कराडमध्ये आला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रसचे तरुण नेते उपस्थित होते. त्यामुळे तरुण पिढी आजही शरद पवार यांच्याच मागे असल्याचे स्पष्ट झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे -कराडमधील पारावरच्या भाषणानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर लगेच राष्ट्रवादीत फूट पडली आहे. जर पंतप्रधान यांचे आरोप खरे आहेत तर राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांनी मंत्रिमंडळात का सहभागी करून घेतले, असा सवाल पवार यांनी केला. तसेच याचा अर्थ मोदी यांनी केलेले आरोप हे खरे नसल्याचे यामुळे सिद्ध झाल्याचे शरद पवार यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत सांगितले. अजित पवार म्हणजे पक्ष नाही. तसेच पक्षाचा अध्यक्ष खंबीर आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी साताऱ्यात दिली.
९ जणांना कारणे दाखवा नोटीस -शरद पवार यांनी यानंतर एक ट्विट करुन प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरुन त्यांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. तसेच अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. काही गैरसमजुतीमुळे पक्षापासून बाजूला गेलेल्यांच्यासाठी पक्षामध्ये परत येण्याकरता सर्वांना दरवाजे खुले आहेत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांना काही दिवसांची मुदत दिली आहे. योग्यवेळी ते परत आले नाहीत तर त्यांचे दरवाजे पक्षासाठी कायमचे बंद असतील असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.