मुंबई- लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात जोरदार प्रचाराने रान उठवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत सामील व्हावे ही आमची इच्छा असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. तसेच राज ठाकरे यांच्या प्रचार दौऱ्याचा महाआघाडीला लाभ होणार असल्याचे भाकित मलित यांनी व्यक्त केले आहे.
आगामी विधानसभेसाठी मनसेने महाआघाडीत सामील व्हावे - नवाब मलिक
भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी राज्यात आणि देशात महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकांच्या आधीच या आघाडीत मनसेचा समावेश करण्याचा राष्ट्रवादीचा विचार होताच, पण काँग्रेसने याला मान्यता दिली नाही. आता विधानसभेतही मनसेला आघाडीत सामील करून त्यांना आवश्यक त्या जागा देण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल आहे.
भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी राज्यात आणि देशात महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकांच्या आधीच या आघाडीत मनसेचा समावेश करण्याचा राष्ट्रवादीचा विचार होताच, पण काँग्रेसने याला मान्यता दिली नाही. आता विधानसभेतही मनसेला आघाडीत सामील करून त्यांना आवश्यक त्या जागा देण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल आहे. यासंदर्भात आम्ही काँग्रेससोबतही चर्चा करायला तयार आहोत. मात्र, आघाडीत येण्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्णय घ्यायचा आहे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. आगामी काळातही भाजपविरोधी शक्तीला एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभेच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे. ठाण्यातही सोमवारी मेळावा घेण्यात आला आहे. जिल्हा -तालुका पातळीवर कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांचा संवाद सुरू आहे. मात्र, आघाडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. पुढच्या काळात पक्षाध्यक्षांनी निर्णय घेतल्यास आघाडीबाबतही विचार होईल अशी शक्यताही देशपांडे यांनी वर्तवली आहे.