मुंबई :अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या गटाची महत्त्वपूर्ण बैठक आज देवगिरी बंगल्यावर झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आज झालेल्या बैठकीत सरकारच्या योजना, पक्षाचे विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकारे आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. आज झालेल्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज ठाकरेंवर मिटकरींची टीका : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर राजकारण तापले आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष या भेटीवर नाराज असून शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे दोघेही आवाहन करत आहेत. बैठकीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करत समाचार घेतला. तर लोक ईडीची नोटीस मिळताच आपली भूमिका बदलतात. त्यांनी अजित पवारांवर भाष्य करणे म्हणजे सूर्याला वाकोल्या दाखवल्यासारखे असल्याची टीका पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केली आहे. आमचा पक्ष तुमच्यासारखा टुणकन उडी मारणारा पक्ष नसल्याचा टोलादेखील मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.