मुंबई - हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, कागल येथील घरांवर मागील आठवड्यात ईडीने छापे टाकले होते. यावेळी मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी ईडीविरोधात घोषणाबाजी केली होती. तसेच मुश्रीफ यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते.
मंगळवारी सुनावणी - मुश्रीफ यांचे मुलं नवी, आबिद आणि साजिद हे संचालक किंवा भागधारक असलेल्या सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि.ला दोन कंपन्यांकडून भरीव व्यवसाय नसताना अनेक कोटी रुपयांचा संशयास्पद व्यव्हार झाल्याचा ईडीने दावा केला होता. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.
हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीकडून याचा निषेध देखील नोंदवण्यात आला आहे. तसेच भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे.
ईडीने बजावले होते समन्स :मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने मुश्रीफ यांना समन्स बजावले होते. साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने हे समन्स बजावले होते. मुश्रीफ यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावण्यात आले.
पहाटेच टाकला होता छापा :हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीने छापे टाकले आहेत. यामुळे हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जाते. मागील आठवड्यातच ईडीच्या पथकाने हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी छापा टाकला होता. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या कारवाईचा कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध करण्यात आला होता.
काय आहे विषय : साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला होता. मुश्रीफ यांच्या नातेवाईकांनी साखर कारखाना खरेदी केल्याचा आरोप केला होता. भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांनंतर ईडीकडून त्यांची चौकशी केली जात आहे.
कार्यकर्ते आक्रमक : ईडीने मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर कार्यकर्त्यांनी भाजप आणि किरीट सोमय्या तसेच ईडीविरोधात घोषणाबाजी केली होती. अचानक ईडीचे पथक आल्याने कार्यकर्ते आणि गावकरी देखील संभ्रमात पडले. मात्र, ईडीचे पथक असल्याचे कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी घरी न जाता तेथेच आंदोलनाला सुरुवात केली.