मुंबई NCP Disqualification Case:लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे खासदार मोहम्मद फजल, श्रीनिवास पाटील यांच्या अपात्रतेबाबत अजित पवार गटानं याचिका दाखल केलीय. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केल्याचं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही लोकशाही मार्गानं भांडत आहोत. राज्यातील जनतेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार, भावना पोहोचवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. यासाठी येत्या पाच नोव्हेंबरपासून पूर्व विदर्भात दौरा करणार असल्याचं तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
खासदार अमोल कोल्हे आमच्या सोबत : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटातील खासदार, आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तसंच याचिकेवर लवकर सुनावणी करावी, अशी देखील मागणी त्यांनी केली होती. त्यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हीही खासदार मोहम्मद फजल, श्रीनिवास पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी याचिका दाखल केलीय. आम्ही लोकशाही मानतो, त्यामुळं लोकशाहीनुसार आमच्याकडं बहुमत आहे. त्यामुळं आम्हाला कारवाईची भीती नाही. खासदार अमोल कोल्हे देखील आमच्या सोबत आहेत. त्यांचे आम्हाला समर्थन आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचा प्रश्नच येत नाही, असेही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.