मुंबई - मुंबई शहरात पक्षाला अधिक काम करण्याची, संघटना वाढविण्याची गरज आहे. नव्यांना संधी दिली पाहिजे, त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मुबंई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरादरम्यान बोलताना म्हणाले. अन्याय अत्याचाराविरोधात उभे राहत, जातीचे राजकारण करणाऱ्या शक्तींविरोधात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिबिरासाठी ज्येष्ठ नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीर घेऊन आपली दिशा ठरवत असलो तरी मजबूत संघटना उभारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
दिल्लीत कायदा सुव्यवस्था बघण्याचा अधिकार राज्याला नाही, केंद्र सरकारला आहे, त्याची जबाबदारी केंद्राची असल्याने दिल्लीतील दंगलीची संपूर्ण जबाबदारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचीच आहे. ही दंगल रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरले आहेत अशी टीकाही पवारांनी आज केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्येही या दंगलीला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा -'नाणार होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ; उद्धव ठाकरे दिलेला शब्द फिरवणार नाहीत'