मुंबई :नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) मुंबई व ठाण्यातील बदलापूर या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यात 20 लाखांची रोकड सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाकडून मुंबईतील आग्रीपाडा परिसरामध्ये करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 220 ग्रॅम एमडी व 20 लाख 5 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. बदलापूर येथून ओडिशा राज्यातून तस्करी करून आणलेल्या 43 किलो गांजा या अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
नागपाडा व आगरिपाडा परिसरात धाड -
एनसीबीने मारलेल्या आग्रीपाडा परिसरातील छाप्या दरम्यान सर्फराज कुरेशी उर्फ पप्या या आरोपीच्या घरात झडती घेतली. त्या ठिकाणी 165 ग्रॅम एमडी अमली पदार्थ मिळाले. 2 लाख 15 हजार रुपयांची रोकड सुद्धा मिळून आली. या आरोपीच्या चौकशीदरम्यान हे अमली पदार्थ त्यास नागपाडा परिसरांमध्ये राहणाऱ्या सुलेमान शमा या आरोपीकडून मिळाले असल्याचं समोर आले. यानंतर नागपाडा परिसरात आरोपीच्या घरात छापा मारला. या ठिकाणी 54 ग्रॅम एमडीसह 17 लाख 90 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सुलेमान हा सध्या फरार असून त्याचा शोध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून घेतला जात आहे.
बदलापूर येथून 43 किलो गांजा जप्त-
बदलापूर येथे करण्यात आलेल्या कारवाईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सनी परदेशी व अजय नायर या 2 आरोपींना 43 किलो गांजासह अटक केली. हे अमली पदार्थ या 2 आरोपींना कुणाल कडू या आरोपीकडून मिळाले. ओडिशामधू हे अमली पदार्थ तस्करी करून आणण्यात आल्याचे समोर आले. यासंदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.