मुंबई- अमली पदार्थ तस्करी प्रकरणी एनसीबीकडून तपास केला जात असताना बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याचा हेअर स्टायलिस्ट सुरज गोडांबे याला एनसीबीने अटक केली आहे. बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान रीगल महाकाला आणि आजम शेख या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास 13 लाख रुपये रोख आणि दोन कोटींहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. यानंतर आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून सुरज गोडांबे याला आज अटक करण्यात आले आहे.
16 ग्रॅम कोकेनसह बॉलिवूडमधला हेअर स्टायलिस्ट अटकेत - सुरज गोडांबेला अटक
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याचा हेअर स्टायलिस्ट सुरज गोडांबे याला एनसीबीने अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईवेळी गोडांबे याच्याकडून 53 हजार रुपये रोख रकमेसह 16 ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या बरोबरच अधिकाऱ्यांनी एक ऑटोरिक्षा सुद्धा जप्त केली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीला 16 डिसेंबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
मलाना क्रीम जगप्रसिद्ध
दरम्यान , बुधवारी अटक करण्यात आलेल्या आरोपी मोहम्मद अजमल शेख यांच्याकडून पाच किलो चरससह तब्बल 13 लाख 51 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. ओशिवरा परिसरातील मिल्लत नगर येथून ही कारवाई करण्यात आली. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक केल्यानंतर तिला जामीन मिळाला असला तरी तिच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात एनसीबीकडून तपास केला जात आहे. त्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
रीगल महाकाला याच्याकडून एनसीबीने हस्तगत केलेला 'मलाना क्रीम' हा अमली पदार्थ जगात सगळ्यात जास्त आवडीचा अमलीपदार्थ असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. याचे उत्पादन भारतातील हिमाचल प्रदेश येथे खास करून घेतल जाते. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत प्रति किलो 40 ते 50 लाख रुपये असल्याचेही सांगितले जात आहे.