मुंबई- शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करायची की नाही याबाबत राष्ट्रवादीने कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेने आधी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडावे. त्यानंतर सरकार स्थापन्यासाठीचा आम्हाला प्रस्ताव द्यावा, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ते हेही वाचा - भाजपच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीची सावध भूमिका, सत्तेचा तिढा चिघळला...
आम्ही सध्या राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत. ते काय निर्णय घेतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. शिवसेनेने आधी भाजपसोबतचे नाते तोडले पाहिजे. त्यांनी केंद्रसरकारमधून बाहेर पडतानाच एनडीएमधूनही बाहेर पडत असल्याचे जाहीर केले पाहिजे. नाहीतर केंद्रात सत्तेत आणि राज्यात वेगळ्या आघाडीत असे चित्रं निर्माण होईल. त्यामुळे शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडून सत्ता स्थापनेबाबतचा रितसर प्रस्ताव द्यावा. त्यांच्या अटी-शर्तीही सांगाव्यात. त्यानंतर आम्हाला काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेता येईल, असे मलिक यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीची मंगळवारी बैठक होणार आहे, या बैठकीत शिवसेनेसोबत जायचे की नाही? याबाबतचा निर्णय होणार असल्याने या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - 'मी पुन्हा येईन...सत्ताच स्थापन करणार नाही, तर मुख्यमंत्री त्यांचा कसा?'
राज्यात कोणतेही 2 पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाहीत. त्यासाठी 3 पक्ष एकत्र यायला हवेत. तीन पक्ष एकत्र आले तरच सत्ता स्थापन होऊ शकते. अन्यथा वेळकाढूपणा होईल. त्यामुळे काँग्रेस आघाडी सरकार स्थापनेसाठी दावा करणार नाही. आमच्याकडे बहुमत नाही, आकडा नाही. त्यामुळे आम्ही सत्तेचा दावा करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.