मुंबई- नारायण राणे शिवसेनेत राहणार असतील तर मी मातोश्री सोडून जाईन अशी धमकी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याचा गौप्यस्फोट स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांच्या आत्मचरित्रात करण्यात आला आहे.
राणे यांच्या इंग्रजी भाषेतल्या 'नो होल्ड्स बार ' आत्मचरित्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. 'ईटीव्ही भारत'कडे राणे यांच्या इंग्रजी आत्मचरित्राच्या पुस्तकातील काही पाने हाती लागली आहेत. या पुस्तकाच्या पानात गेल्या दोन दशकातील घडामोडींवर राणे यांनी भाष्य केले असून यात काही गौप्यस्फोटही करण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना सोडावी लागली असेही राणे यांनी नमूद केले आहे. उद्धव ठाकरे यांनीच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मला पक्षातून काढून टाकण्याचा तगादा लावला होता. राणे शिवसेनेत राहणार असतील तर मी मातोश्री सोडून जाईन, अशी धमकीही उद्धव ठाकरे यांनी दिली होती असा गौप्यस्फोटही राणे यांच्या आत्मचरित्रात करण्यात आला आहे. युती सरकारच्या काळात मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले, याचा राग जोशी यांनी मनात ठेवला होता. जोशी यांनीच उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून पक्षात खलबत चालवली होती. मला डावलून सुभाष देसाई यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारीही उद्धव ठाकरे यांनी केली होती.
युती सरकारच्यानंतर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव होता. राष्ट्रवादीचे काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात होते. सरकार बदलाचा डाव यशस्वीही झाला असता पण बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या चर्चेनंतर या डावाला वेगळे वळण लागून डाव फसला असल्याचेही राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.
दरम्यान, राणे यांच्या या आत्मचरित्राचे अद्याप प्रकाशन झाले नाही, पण प्रकाशनाच्या आधीच राणे यांचे आत्मचरित्रावर खळबळ उडाली आहे. राणे यांच्याबाबतीत शिवसेनेने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच राणे यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी 'अब आयेगा मजा, सबका होगा हिसाब' असे ट्विट केले होते.