मुंबई :कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमा भागा बाबत जी भूमिका घेतली आहे त्यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. भाजप ही एक जूमलेबाज पार्टी असून वारंवार ते जनतेच्या विरोधातच भूमिका बजावत असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले आहे. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा भागात राज्य सरकारने काही योजना आणल्या आहेत. त्याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे. राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे. कर्नाटक मध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपचे सरकार असताना अशा पद्धतीने सीमा भागातील लोकांवर अन्याय होत असेल तर त्यांनी कोणाच्या आशेवर जगायचे, असा प्रश्नही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
कार्यक्रमाला परवानगी देऊ नका -बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा वसई-विरार येथे दिनांक १८ व १९ मार्च २०२३ रोजी एक कार्यक्रम होत असल्याची माहिती आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणारे विधान करुन लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी देऊ नये अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे, अंधश्रद्धेला आपल्या राज्यात अजिबात थारा नाही, महाराष्ट्राने तसा कायदाही केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या वसई-विरार येथील कार्यक्रमाला परवानगी दिल्यास जनतेची दिशाभूल करून त्यांच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळ मांडला जाऊ शकतो, असेही पटोले म्हणाले.