मुंबई : शरद पवार व अजित पवार यांच्यातील 'गुप्त' बैठकीनंतर महाविकास आघाडीतील वातावरण तापले आहे. या भेटीची माहिती आघाडीच्या नेत्यांना नव्हती अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, रविवार (१३ ऑगस्ट) रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत काका - पुतण्यांच्या गुप्त भेटीवर चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत शरद पवारांशी बोलतील : 'बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर पसरलेल्या अफवांबाबत चर्चा झाली. या अफवा गंभीर आहेत. आम्ही त्याबद्दल शरद पवारांशी बोलू', असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या विषयावर भाष्य केले. 'बैठकीत शरद पवारांबद्दल पसरवल्या जात असलेल्या गैरसमजावर चर्चा झाली. मात्र, शरद पवार यांच्याशी आमची चर्चा झालेली नाही. संजय राऊत त्यांच्याशी बोलणार आहेत', असे नाना पटोले म्हणाले.
या विषयावर लवकर भूमिका स्पष्ट झाली पाहिजे : 'सध्या शरद पवारांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. तसेच महाविकास आघाडीत कोणताही संभ्रम होऊ नये अशी आमची धारणा आहे. त्यामुळे त्यांची या विषयावर लवकरात लवकर भूमिका स्पष्ट झाली पाहिजे', अशी अपेक्षा नाना पटोले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
बैठकीत 'इंडिया' आघाडीच्या बैठकीबाबत सविस्तर चर्चा : आजच्या या बैठकीत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे नाना पटोलेंनी सांगितले. तसेच ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या निष्पाप लोकांचे मृत्यू, वाढती महागाई, शेतकरी आत्महत्या इत्यादी विषयांवरही चर्चा झाल्याचे पटोले म्हणाले. महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. या बैठकीसाठी केंद्रातील काँग्रेसचे बडे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हेही वाचा :
- Sharad Pawar Ajit Pawar Secret Meeting : काका-पुतण्यांची गुप्त बैठक; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले...
- Sharad Pawar With BJP : मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सांगतो...; भाजपासोबत जाण्याच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्टीकरण
- Maharashtra Politics : ठाकरे गटाचे दोन खासदार, आठ आमदार लवकरच शिवसेनेत; 'या' खासदाराचा गौप्यस्फोट