महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या महापौर पदासाठी 'या' नगरसेवकांच्या नावाची चर्चा - councilors for the post of Mayor of Mumbai

जागतिक दर्जाच्या व देशाची राजधानी असलेल्या मुंबई शहराचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. खुल्या प्रवर्गातून कोणताही महिला किंवा पुरुष नगरसेवक महापौर होऊ शकत असल्याने महापौर पदासाठी इच्छूक नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.

मुंबईच्या महापौर पदासाठी 'या' नगरसेवकांच्या नावाची चर्चा

By

Published : Nov 14, 2019, 2:35 AM IST

मुंबई - जागतिक दर्जाच्या व देशाची राजधानी असलेल्या मुंबई शहराचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. खुल्या प्रवर्गातून कोणताही महिला किंवा पुरुष नगरसेवक महापौर होऊ शकत असल्याने महापौर पदासाठी इच्छूक नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. या पदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होत असल्याने या पदावर बसण्याची संधी कोणाला मिळणार, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


मुंबई महापालिकेत गेले 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे मागच्या वेळेला महापौर पद हूकले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. पालिकेत यशवंत जाधव यांनी आपले राजकीय वजन निर्माण करून पक्षाचा वचननामा पूर्ण करण्याकडे भर दिला आहे. यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांचीही मागील वेळेस महापौर बनण्याची संधी हूकली होती. त्यांनी अनेक वेळा पक्षाच्या आदेशाचा मान राखत तडजोड केली आहे. माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर हे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवत आला. महिला विभाग प्रमुख किशोरी पेडणेकर यांनाही अनेक वेळा समित्यांच्या अध्यक्ष पदाने चकवा दिला आहे. आदित्य ठाकरे आमदार झाल्याने त्यांचीही महापौर पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.


माजी सुधार समिती अध्यक्ष अनंत उर्फ बाळा नर यांची मातोश्रीवर चांगलीच उठबस आहे. त्यामुळे त्यांचेही नाव महापौर पदासाठी चर्चेत आहे. गेल्या 20 वर्षात अनुसूचित जमातीला महापौर पद दिले नसल्याने, या जमातीमधील संजय अगलदरे यांचीही महापौर पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.


सभागृह नेत्या व माजी आमदार विशाखा राऊत यांना महापौरपदी बसवून त्यांच्या जागी माजी महापौर श्रद्धा जाधव यांना सभागृह नेता बनवले जाईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या टीममधील तरुण नगरसेविका शीतल म्हात्रे यांचीही वर्णी महापौर पदी लागू शकते, अशी चर्चा महापालिकेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details