मुंबई - नाफेड तूर खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्यांची जात विचारल्याचा मुद्दा गुरूवारी विधान परिषदेत गाजला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या जात विचारल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे जात विचारली जाऊ नये. संबंधितांना यासाठी निर्देश दिले जातील, अशी ग्वाही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. सुरजित सिंह ठाकुर यांनी विधान परिषदेत हा विषय मांडला होता.
नाफेडच्या केंद्रात शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी दिलेल्या फॉर्ममध्ये जातीचा उल्लेख करावा लागत आहे. राज्य सरकारकडून होत असलेला हा प्रकार निंदनीय असल्याचे ठाकूर म्हणाले. त्यावर दिवाकर रावते यांनी नाफेड ही केंद्र सरकारची यंत्रणा असून तेथे होत असलेल्या प्रकाराला राज्य सरकारला दोष देण्यात अर्थ नाही, असे सांगितले.