मुंबई MVA Delegation Met Governor : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation Issue) चांगलाच तापला आहे. तसेच राज्यातील अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतमालाला भाव नाही. ड्रग्जचे मोठे साठे सापडले असून, राज्यात कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडला आहे. तसेच मराठा व ओबीसी समाजामध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. या समाजांकडून आरक्षणाची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नाही. तसेच मराठा आरक्षणावरून मराठा बांधव आक्रमक झालाय. अनेक ठिकाणी जाळपोळ, नेत्यांना गावात प्रवेशबंदी आदी कारणामुळं मराठा समाजातील तरुण पेटून उठलाय. सरकार यावर ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळं राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन तातडीने बोलवावं, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्ठमंडळानं राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्याकडे केली. यावेळी मविआतील अनेक नेते उपस्थित होते.
राज्यपालांना दिलं निवेदन:महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज (सोमवारी) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनभर भेट घेऊन निवेदन दिलं. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांवरून तातडीने विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, अशी निवेदनातून मागणी केली. राज्यात सप्टेंबर महिन्यापासूनच विविध जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. पावसाअभावी २४ जिल्ह्यातील खरीप पीकं वाया गेली आहेत. राज्यात दुष्काळ आणि शेतीचे प्रश्न गंभीर झाले आहेत; पण राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतयं. रब्बी हंगामाची स्थितीही फारशी चांगली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी उजळून निघाली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून तातडीनं मदत दिली पाहिजे. अशी मागणी यावेळी मविआतील शिष्ठमंडळानं राज्यपालांकडे केली.