मुंबई:माहीम येथील बाबा मगदूम यांच्या दर्ग्याच्या पाठीमागे १०० मीटरच्या आत भर समुद्रात एका धार्मिक स्थळाचे निर्माण अनेक वर्षांपासून केले जात आहे. हे धार्मिक स्थळ म्हणजे मजार असून ती अनेक वर्षांपासून तिथे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याविषयी बोलताना स्थानिक म्हणतात की, आम्ही मागील ६० वर्षांपासून ही मजार बघत आलो आहोत. येथे कुठल्याही पद्धतीचे अनधिकृत बांधकाम नाही. या बांधकामाची नोंदसुद्धा सरकारी दरबारी झाली आहे, असे असताना केवळ राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावरून हे बांधकाम तोडले जात आहे, याचे आम्हाला फार दुःख आहे, अशी प्रतिक्रिया मुस्लिमांनी दिली.
इथे कुठलाही भेदभाव नाही:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये माहीम येथील मगदूम बाबा दर्गाच्या पाठीमागे समुद्रात होत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाचा मुद्दा उपस्थित करत ते हटवण्यासाठी राज्य शासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. परंतु, शासनाने यावर तातडीने कारवाई करत २४ तासांच्या आत हे अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले. यावर मुस्लीम बांधव म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडेसुद्धा अनेक मुस्लीम बांधव आहेत. तेसुद्धा त्यांच्यासोबत राहतात. आम्ही लहानपणापासून ही मजार बघत आलो आहोत. इथे अनेक भाविक येतात आणि प्रसाद अर्पण करतात. इथे कुठलाही भेदभाव नाही; परंतु अचानक कोणालातरी जाग येते आणि याविषयी सांगितले जाते, हे फार हे खेदजनक असल्याचेही यांनी सांगितले आहे.