मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात पार पडला. ह्या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत हजेरी लावली. शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान (Sayeed Khan) यांच्या नेतृत्वाखाली 15 हजार मुस्लिम शिवसैनिक या मेळाव्याला हजर झाले होते. माध्यमांशी बोलताना सईद खान म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांच्या मार्गावर आम्ही सर्व मुस्लिम चाललो आहोत. (Muslim ShivSainik) आज त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. एकनाथ शिंदे यांचे विचार म्हणजे विकासाचे विचार आहेत. नागपूर पासून मुंबई पर्यंत मुस्लिम समाजाचे 500 नगरसेवक शिवसेनेत आले आहेत. आमची मुस्लिम समाजाची कार्यकारिणीच 9 हजार पदाधिकाऱ्यांची आहे."
मुस्लिम रुग्णांना 13 कोटींची मदत:पुढे बोलताना सईद खान म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्या सोबत मुस्लिम समाज जोडण्याचे मुख्य कारण म्हणजे, जेव्हा अल्पसंख्यांक समाजाचे लोक माझ्याकडे काम घेऊन येतात तेव्हा मी फक्त एक पत्र मुख्यमंत्र्यांना देतो. लगेच या माझ्या लोकांचे काम होते. आता पर्यंत 13 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी रुग्णांना केली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली. त्यामुळे आज आमची मुलं शिक्षणासाठी देशभर जात आहेत. त्यांना मदत मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे मला खात्री आहे 2024 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठ्या मतांनी विजयी होईल.
हमासलाही पाठिंबा देऊ शकतात:कालच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.बाळासाहेबांनी म्हटलं होतं, माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेल. आता यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तरी आश्चर्य वाटणार नाही. एमआयएमचा पाठिंबा घेतला तरी आश्चर्य वाटणार नाही. आता हे दहशतवादी संघटना हमासलाही पाठिंबा देऊ शकतात. किती लाचारी करणार? यांना शिवसैनिकांशी काही देणघेणं नाही. मी आणि माझं कुटुंब यापुढे यांना काही दिसत नाही, असा हल्लाबोल शिंदेंनी काल दसरा मेळाव्यातून केला.
आमच्यासोबत सर्व धर्माचे लोक येत आहेत: बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा गोठला तर चालेल का? बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी आपला मतदानाचा हक्क गमावला. मात्र, त्यांनी कधीही माघार घेतली नाही. हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. तरी आमच्यासोबत सर्व धर्माचे लोक येत आहेत. अब्दुल सत्तारही आमच्या मंत्रिमंडळात आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.