मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे नव्याने दोन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक मुंबईचा तर एक ठाण्याचा रहिवाशी आहे. मुंबईमध्ये हिंदुजा रुग्णालयात आढळलेल्या रुग्णाच्या घरी आणि सहवासात आलेल्या लोकांची शोध मोहीम पालिकेने राबवली. तर हिंदूजा रुग्णालयामधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देखरेखीखाली ठेवल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपमुख्य आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी दिली.
'हिंदुजा'मधील कोरोना रुग्णांच्या घरी पालिकेची शोध मोहिम; डॉक्टर कर्मचारीही देखरेखीखाली हेही वाचा -COVID19 : 'पुण्यात आणखी एक रुग्ण, कोरोनासाठी खबरदारीचा नवा प्लॅन आखणार'
ठाणे जिल्ह्यातील रुग्णाची माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले. आज दिवसभरात मुंबईत २८ जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यां सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी एकालाही कोरोनाची लागण झालेली नसल्याने आज मुंबईत कुठलाही नवीन कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
मुंबईमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती देताना शाह म्हणाल्या, मुंबईमध्ये आधी पुणे येथील रुग्णांच्या सहवासात आलेले दोन कोरोनाचे रुग्ण होते. गुरुवारी रात्री आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी एक रुग्ण हिंदूजा रुग्णालयात भरती होता. या रुग्णाला पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेले आणि त्याच्यावर इलाज करणारे हिंदूजा हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णाच्या जवळच्या ७ जणांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. याच रुग्णाच्या सहवासात आलेल्या मात्र त्यांना जास्त जोखीम नाही अशा आणखी ७ जणांना त्यांच्या घरात देखरेखीखाली राहण्याच्या आणि गर्दीमध्ये न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर हा रुग्ण राहत असलेल्या सोसायटी आणि बाजूच्या इमारतीमधी ४६० घरांमधील रहिवाशांची तपासणी करण्यात आली असता त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
२३३ आयसोलेशनचे बेड -
मुंबई महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून कस्तुरबा रुग्णालयात ७८, ट्रॉमा केअरमध्ये २०, कुर्ला भाभामध्ये १०, वांद्रे भाभामध्ये १०, राजवाडीमध्ये २०, फोर्टिसमध्ये १५ मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात ५०, रेल्वेच्या भायखळा येथील आंबेडकर रुग्णालयात ३० असे एकूण २३३ आयसोलेशन बेड तयार ठेवले आहेत. पालिका आयुक्तांनी अंधेरी येथील सेव्हन हिल हॉस्पिटलला सकाळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी या रुग्णालयातील ३०० बेड आयसोलेशन बेड करण्याचे आदेश दिले आहेत. एक ते दोन दिवसात हे बेड तयार असतील.
विमानतळावर २ लाख प्रवाशांची तपासणी -
आतापर्यंत मुंबई विमानतळावर २ लाख १७ हजार ६३६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत २३८ लोकांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी २०३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. २८ जणांचे रिपोर्ट आज निगेटिव्ह आलेले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात आज करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकही चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही.
आता पर्यंत गेल्या १४ दिवसात विदेशातून प्रवास केलेल्या ७६९ प्रवाशांच्या संपर्कात पालिका आहे. त्यापैकी आतापर्यंत्त ७६५ प्रवाशांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. तर ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १४ दिवसाचा फॉलोअप पूर्ण केलेले १९७ प्रवासी असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.