मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. मागील महिन्यात दिवसाला ७० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज गुरुवारी धारावीत १ रुग्ण आढळून आला आहे. धारावीत सध्या असून १९ सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे धारावीची वाटचाल शून्यकडे सुरु आहे. धारावीकरांनी दुसऱ्यांदा कोरोनावर मात केली आहे.
कोरोना : धारावीची वाटचाल शुन्याकडे, आज एका रुग्णाची नोंद
आज गुरुवारी धारावीत १ रुग्ण आढळून आला आहे. धारावीत सध्या असून १९ सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे धारावीची वाटचाल शून्यकडे सुरु आहे.
धारावीत १९ अॅक्टिव्ह रुग्ण -
कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली होती. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात ७ ते ११ हजारावर गेली होती. धारावीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. धारावीत ८ मार्चला १८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. ११ एप्रिलला धारावीत ७६ नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या घटू लागली आहे त्याचप्रमाणे धारावीतील रुग्णसंख्याही घटू लागली आहे. मे महिन्यात १ मे ला २८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात घट होत आली आहे. १०, ११, १३, २२ मे ला दिवसाला ९ रुग्णांची नोंद झाली आहे. २५ मे ला ७ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात धारावीत ३ ते ४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर आज गुरुवारी १ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या ६८२९ वर गेली आहे. त्यापैकी ६४२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
धारावीत सहावेळा शून्य रुग्ण -
मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. दाटीवाटीने असलेली घरे, सार्वजनिक शौचालय यामुळे धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. धारावीत १ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चार टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. जुलै ऑगस्टनंतर धारावीतील दोन अंकी असलेली रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या एक अंकावर आली होती. २४ डिसेंबर, २२ जानेवारी, २६ जानेवारी, २७ जानेवारी, ३१ जानेवारी, २ फेब्रुबारी या सहा दिवसात धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत ७ लाख कोरोना रुग्ण -
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ८ हजार ७ वर पोहचला आहे. मृतांचा आकडा १४ हजार ९३८ वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या ६ लाख ७४ हजार २९६ वर पोहचली आहे. मुंबईत सध्या १६ हजार ५८० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी ४७७ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३० चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर १५१ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी एकूण ६३ लाख १९ हजार ९७८ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.