मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर वर्चस्व राखलेल्या आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी आता मनसे, भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध सत्ताधारी घटक पक्ष असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी होणारी महत्त्वाची निवडणूक असून मुंबईवर कोणाचे वर्चस्व राहील, हे दाखवणारी लिटमस टेस्ट म्हणून याकडे पाहिले जात असल्याची प्रतिक्रिया, राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
निवडणुकीसाठी दहा जागा आरक्षित :मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती. विविध पक्ष, विद्यार्थी संघटना मतदार नोंदणीसाठी आग्रही होत्या. आता निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी दहा जागा आरक्षित आहेत. यापैकी पाच खुल्या प्रवर्गासाठी तर पाच राखीव प्रवर्गासाठी आहेत. येत्या 10 सप्टेंबरला ही निवडणूक होणार असून 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.