मुंबई:महाराष्ट्रमध्ये गेल्या वर्षी सत्तांतर झाले आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील पहिली निवडणूक मुंबई विद्यापीठात होत आहे. सिनेटच्या पदांसाठी ही निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी अधिसूचना मुंबई विद्यापीठाने जारी केलेली आहे. दहा जागांसाठी हे एकूण मतदान होईल तर जवळजवळ लाखभर पदवीधर यामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
10 जागांसाठी होणार मतदान:मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट सदस्यांच्या 10 जागांसाठी जे मतदार होणार आहे त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील पाच आणि राखीव प्रवर्गातील पाच जागा आहेत. या राखीव जागांमध्ये एक अनुसूचित जाती, एक विमुक्त जाती व एक भटक्या जमाती तर बाकी तीन जागा महिलांकरिता राखीव ठेवलेल्या आहेत.
सिनेट निवडणुकीसाठी अर्ज छाननी:पदवीधर सिनेट सदस्यांना अर्ज भरण्यासाठी 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत विद्यापीठाने जारी केलेली आहे. अधिकृतपणे येणाऱ्या सर्व अर्जांची छाननी 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता केली जाणार आहे. सर्व अर्ज वैध पद्धतीने दाखल झाल्यास आणि दाखल झालेल्या अर्जांची नोंदणी झाल्यानंतर छाननी होणार आहे. परंतु छाननी झाल्यानंतर कोणाला त्याबद्दल आक्षेप किंवा काही म्हणणे मांडायचे असल्यास 23 ऑगस्ट 2023 या दिवसापर्यंत कुलगुरू यांच्याकडे आपले म्हणणे मांडता येईल. त्यानंतर एक दिवसाआड म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देखील या अधिसूचनेमध्ये नमूद केलेली आहे.
प्रत्यक्ष मतदान:अर्ज मागे घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 10 तारखेला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळामध्ये सिनेट सदस्यांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी 13 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होईल, अशी अधिसूचना विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेली आहे. मागील पदवीधर सिनेटच्या निवडणुकीत युवा सेनेचे वर्चस्व होते. परंतु यावेळी युवा सेनेला टक्कर देण्यासाठी छात्र भारती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या देखील तयारी करत आहे. त्यामुळे युवा सेनेला पदवीधर सिनेट निवडणुकीमध्ये मोठे आव्हान पेलावे लागणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.