मुंबई - देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज मुंबई विद्यापीठाने तब्बल ७० हून अधिक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात 'ईनाडू इंडिया'ने १६ फेब्रुवारीलाच मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होईल, अशी शक्यता व्यक्त केली होती.
मुंबई विद्यापीठाच्या ७० हून अधिक परीक्षा पुढे ढकलल्या - मुंबई
देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विद्यापीठ व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामात सहभागी होतात. यामुळे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ एप्रिल व ३० एप्रिल या दिवशी परीक्षेचे पेपर न ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुका या ४ टप्प्यात होत असल्या, तरी त्या मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात २ टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिलला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे या जिल्ह्यात व सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात, तर २९ एप्रिल २०१९ ला मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड (मावळ) या जिल्ह्यांमध्ये या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या २ टप्प्यात ७० हून अधिक परीक्षांचे पेपर हे पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यात ५ दिवसांच्या परीक्षांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी २२, २३ व २४ एप्रिल असे ३ दिवस, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी २९ व ३० एप्रिल २०१९ असे एकूण ५ दिवसांचे विविध परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहे. पुढे ढकललेल्या परीक्षांच्या सुधारित तारखा व वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकीपूर्वी विद्यापीठा अंतर्गत असलेले अनेक महाविद्यालये निवडणुकीची केंद्रे आहेत. निवडणुकीच्या १ दिवस आधी मतदान केंद्रासाठी निवडणूक आयोग सदर महाविद्यालये ताब्यात घेते. त्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामात सहभागी होतात. त्यामुळे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशीच्या परीक्षा केंद्रावर जाण्यास उशीर होण्याची शक्यता असते. यामुळे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ एप्रिल व ३० एप्रिल या दिवशी परीक्षेचे पेपर न ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.