मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठे आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये थांबलेल्या परीक्षांसोबतच सीईटी आदी परीक्षांसाठी उच्च शिक्षण विभागाने नेमलेल्या कुलगुरूंच्या समितीची पहिली बैठक आज (मंगळवारी) पार पडली. मात्र, परीक्षांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या कुलगुरुंमध्येच समन्वय नसल्याने कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. यामुळे या बैठकीत केवळ थातूरमातूर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली.
राज्यातील सर्वच विद्यापीठातील परीक्षा कशा घ्यायच्या यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने चार कुलगुरू आणि दोन संचालकांची , एक समिती ६ एप्रिल रोजी स्थापन केली होती. त्यानंतर आज तब्बल नऊ दिवसानंतर या समितीची पहिली बैठक ही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यातून पार पडली. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये परीक्षांच्या संदर्भात एक नियमावली आणि पॅटर्न नसल्याने त्यात मेळ कसा घालायचा हा सर्वात मोठा प्रश्न समितीपुढे असताना अद्यापही समितीपुढे किती परीक्षा आहेत, त्या किती दिवस चालतात, त्या कशा घेतल्या जातात, याची माहितीच आली नाही. त्यामुळे ही माहिती आता मागवली जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.