मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. सदर आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्थगित करण्यात आल्या आहेत.
बैठकीत तोडगा नाही :मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.मुंबई विद्यापीठात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात या सर्व संघटनांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यातूनही कोणताही तोडगा निघाला नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
काल या परीक्षा झाल्या :गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या १० परीक्षा सुरळीत पार पडल्या. त्यात एमए सत्र ४, एमए हिंदू स्टडीज, एमएस्सी सत्र ४, एमकॉम सत्र २ (सिबीजीस), एमकॉम सत्र २ (चॉईसबेस), एलएलबी सत्र ३, एलएलबी / बीएलएस सत्र ३ (५ वर्षीय ), एमकॉम भाग १ (वार्षिक), बी.व्होक. हेल्थ केअर सत्र ५, बी. व्होक. हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम सत्र ५ या परीक्षा काल झाल्या आहेत. विविध विभागांच्या दहा परीक्षा सुरळीत झाल्या. परंतु कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता आजपासून होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे.
परिक्षा पुढे ढकलली :मुंबई विद्यापीठाच्या वतीने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. यंदाही कायद्याच्या परिक्षा होत होत्या. या परीक्षांसाठी वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. ३० जानेवारी रोजी कायद्याची परीक्षा होणार होती. मात्र त्याच दिवशी महाराष्ट्र विधान परिषदेची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार होती. त्यामुळे त्या दिवशी होणारी परीक्षा पुढे ढकलून ७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते.
हेही वाचा : Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन