मुंबई -लॉकडाउनमध्ये मित्रांबरोबर विना मास्क क्रिकेट खेळणाऱ्या २० वर्षीय आरोपीची जामीन याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कुरेशी नामक तरूण त्याच्या अन्य सहा मित्रांसोबत रस्त्यावर क्रिकेट खेळत होता. तेव्हा त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
४ एप्रिल रोजी गस्त घालत असलेल्या पोलिसांना दक्षिण मुंबईतील जे. जे. मार्गावर काही युवक रस्त्यावर क्रिकेट खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसजवळ येत असल्याचे पाहून मुलांनी तिथून धूम ठोकली. मात्र, घाईत ते आपले मोबाईल फोन मागेच विसरले. ते घेण्यासाठी परत आले असता पोलीस हवालदाराने त्यांना हटकले आणि मास्क विना खेळत असल्याचे सांगत कारवाई सुरू केली. त्यावेळी झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचाऱ्यास दुखापत झाली. यावेळी पोलिसांनी त्यापैकी दोन मुलांना पकडले. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या दोघांवर आयपीसी कलम ३५३, १३३ अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तर, अन्य सहकारी फरार झाले आहेत.