Mumbai Rain Update : मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी साचले पाणी, वाहतुकीला बसला फटका - अंधेरी सबवे बंद
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. रस्ते वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
मुंबई पाऊस
By
Published : Jun 30, 2023, 1:23 PM IST
|
Updated : Jun 30, 2023, 6:53 PM IST
मुंबईत काही ठिकाणी साचले पाणी
मुंबई : मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे लोकल गाड्यांचा वेग मंदावला आहे.
जनजीवन विस्कळीत -मुंबईच्या काही भागात रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. शुक्रवारी सकाळी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू असल्याने लोकल ट्रेनची सेवा काही प्रमाणात मंदावली. नैऋत्य मोसमी पावसाने 25 जून रोजी मुंबईत प्रवेश केला, तेव्हापासून मुंबईत सतत पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 45, पूर्व उपनगरात अनुक्रमे 45 मिमी आणि पश्चिम उपनगरांमध्ये सरासरी 61 मिमी पाऊस झाला आहे. शुक्रवारी पहाटेपासून शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबईकरांची धादंल उडाली आहे. पावसाची तीव्रता उपनगरांमध्ये जास्त आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे.
मुंबईत पाणी कुठे तुंबत असते?
अंधेरी सबवे पाणी साचल्यामुळे बंद:पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान असलेला अंधेरी सबवे पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय होत असल्याची तक्रार केली आहे. सबवे बंद असल्याने उपनगरातील काही भागांतही वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवा नेहमीप्रमाणे सुरळित राहिल्याचे, रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान सेवा चालवणाऱ्या हार्बर मार्गासह काही मार्गावरील रेल्वे उशीरा धावल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.
मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज-बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टच्या (BEST) प्रवक्त्यानुसार पावसामुळे बस सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली. पुढील तीन ते चार तासांत मुंबई आणि त्याच्या शेजारील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडी मुंबईने शहर आणि उपनगरात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
पावसावरुन राजकारण - पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई 100 टक्के केल्याचा दावा केला जात असतो. मात्र, पहिल्याच पावसात मुंबईतील विविध ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही राजकारण तापले आहे. पहिल्या पावसानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टिका केली होती. आता आजही अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे या विषयावर भाजपचे नेते गप्प का? असा सवाल राष्ट्रवादीने विचारला आहे.
मुंबईतील तुंबलेल्या पाण्यावर भाजप नेते गप्प का आहेत? मुंबई पाण्याखाली जाणार नाही असे वारंवार सांगितले जात होते. मात्र, पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याचे दिसून आले. त्यामुळे यावर आता भाजपच्या नेत्यांनी तोंड उघडावे - महेश तपास, प्रवक्ते, राष्ट्रवादी
पाणी तुंबण्याची कारणे
मुंबईला पाणी पुरविणाऱ्या जलाशयातील साठा वाढला-24 जून ते 29 जून दरम्यान केवळ सहा दिवसांत शहरात 95 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसात संततधार पाऊस झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. 28 जून रोजी या जलाशयांचा एकूण पाणीसाठा 7.26 टक्के होता. हा जलसाठा आता सततच्या पाऊसामुळे 10.88 टक्क्यांवर गेला आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून मुंबईला दररोज 3,800 एमएलडी पाणीपुरवठा होतो.
या पाच ठिकाणी दरवर्षी तुंबते पाणी
नाना चौक (ग्रँट रोड)- नाना चौक हा दक्षिण मुंबईत ग्रँट रोडच्या बाजूला असलेल्या आलिशान तारदेव परिसराजवळ शहरातील मुख्य ठिकाण आहे. अत्यंत उच्चभ्रू परिसर असलेल्या या भागात एक तासापेक्षा जास्त पाऊस झाल्यास पाणी तुंबण्याची मोठी समस्या होते.
कलानगर जंक्शन (वांद्रे)- कलानगर जंक्शन हे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या (BKC) पुढे आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागात पाणी साचल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे बीएमसीने पावसाच्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी येथे पंप बसवले आहेत
दहिसर- दहिसर हे मुंबईच्या अत्यंत उत्तरेकडील टोकावरील लहान उपनगर आहे. येथे उत्तर भारतीयांचे प्रमाण अधिक आहे. दहिसरमध्ये पावसाचे प्रमाण साचण्याचे प्रमाण अधिक आहे.
हिंदमाता (दादर)- केवळ पंधरा मिनिटात हिंदमाता भागात पाणी साचते. या ठिकाणी अनेक जुन्या इमारती व सखल भाग असल्याने पावसात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक आहे.
गांधी मार्केट (सायन)- गांधी मार्केट हा सखल भाग असल्याने येथेही पावसाळ्यात पाणी साचते. केवळ घाऊक बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असल्याने गर्दीचे प्रमाण जास्त. तसेच पावसाळ्यातील वाहतूक कोंडीचे प्रमाणदेखील अधिक असते