मुंबई : मुंबईत पाऊस उशिरा दाखल झाला असला तरी पावसाळ्यात पसरणाऱ्या आजारांचा मुंबईत पहिला बळी गेला आहे. ठाण्यातील एका 38 वर्षीय व्यक्तीला मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा लेप्टोस्पायरोसिस या आजाराने मृत्यू झाला आहे.
संसर्गजन्य आजारात मोठ्या प्रमाणात वाढ : याबाबत अधिक माहिती अशी की, मृत व्यक्तीला 23 जून रोजी नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या इसमाची तपासणी केली असता डॉक्टरांनी लेप्टोस्पायरोसिस संक्रमित असल्याचे निदान केले मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. सदर रुग्ण ठाणे येथील रहिवासी असून, या रुग्णाला इतरही आजार होते. अशी माहिती पालिकेने दिली आहे. मागील एक महिन्यात संसर्गजन्य आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार मागील महिनाभरात गॅस्ट्रो संक्रमित 1744 रुग्ण, डेंग्यू 353, मलेरियाचे 676 रुग्ण पालिकेच्या निदर्शनास आले आहेत.
लोकांना लेप्टोस्पायरोसिसचा धोका : लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा या जिवाणूमुळे होणारा आजार आहे. हा जीवाणू दूषित पाण्यात गाय, म्हैस, शेळी, बकरी, डुक्कर, कुत्रे या प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. त्यामुळे पाण्यात काम करणाऱ्या लोकांना लेप्टोस्पायरोसिसचा धोका असतो. पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसच्या आजारात वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काळजी घ्यावी. असे आवाहन पालिकेने केले आहे. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. महापालिकेने सर्व रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा उपलब्ध करून दिला आहे.
काय काळजी घ्याल? : पावसाळ्यात सांडपाणी विरहित किंवा पिण्याच्या जलसाठ्यात आत-बाहेर येणार नाही आणि चेहरा व हाताशी संपर्क येणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. दूषित पाण्याचा कोणताही अपरिहार्य संपर्क असल्यास हातमोजे आणि गमबूट वापरावेत. दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यास हात व पाय साबणाने आणि पाण्याने धुवावेत. दूषित पाण्यात उगवलेल्या पालेभाज्या चांगल्या प्रकारे धुवाव्यात. अवयवांच्या जखमांवर अँटीबॅक्टेरियल क्रीम लावावे. उरलेले शिळे अन्न उघड्यावर फेकण्याऐवजी बंद डस्टबिनमध्ये टाकावे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. जेणेकरून उंदीर आणि झुरळांचा प्रादुर्भाव टाळता येईल.
हेही वाचा :
- Juice to Drink in Monsoon : पावसाळ्यात तुम्हाला गंभीर आजार टाळायचे असतील, तर या आरोग्यदायी रसाचा आहारात समावेश करा
- National Doctors Day 2023 : देशात का साजरा केला जातो डॉक्टर्स 'डे'? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
- Cow Milk vs Buffalo Milk : म्हशीचे दूध की गाईचे दूध, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते जास्त फायदेशीर ?