मुंबई - अपघात असल्याचे भासवून सुपारी देऊन हत्या करणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखा पथक-३ ने अटक केली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर हाकागदोपत्री अपघात वाटत होता. मात्र, तब्बल चार वर्षांनंतर खरी माहिती समोर आली आहे.
४ वर्षांपूर्वी १४ जानेवारी रोजी वडाळा ट्रक टर्मिनल परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेने एक व्यक्ती मरण पावल्याची घटना घडली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा झाला आणि ज्या गाडीने अपघात झाला, त्या गाडीचा शोध सुरू केला. घटनास्थळी एकही सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांना या प्रकाराचा हवा तसा तपास करता आला नाही. मात्र, हा खटला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पथक-३ च्या अधिकाऱ्यांकडे पोहचताच तांत्रिक गोष्टी संशयास्पद आढळून आल्याने पुन्हा तपास सुरू झाला.
या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली तेव्हा मृत इकलाख खान आणि त्याचा व्यवसायातील भागीदार सैजुद्दीन कुरेशी उर्फ पप्पू (२८) यांच्यात व्यावसायिक वाद होते अस समोर आले. या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी जाऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, मुख्य आरोपीसह एकाला अटक करण्यात आली आहे.