मुंबई -हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणी वादात अडकलेल्या मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वझे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आता त्यांची रवानगी नागरी सुविधा केंद्राच्या कक्ष-1मध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आजच वझे यांना क्राइम ब्रांचमधून सुरुवातीला नियंत्रण कक्षात पाठवले गेले होते. मात्र, आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे.
एटीएसने नोंदवला वझे यांचा जवाब -
बुधवारी पोलीस अधिकारी सचिन वझे यांची एटीएस कडून तब्बल 10 तास चौकशी करुन जबाब नोंदण्यात आला. मनसुख हिरेन यांच्याकडे असलेली स्कॉर्पिओ गाडी ही तब्बल 4 महिने सचिन वझे या अधिकाऱ्याच्या ताब्यात होती, असे आरोप मृत हिरेन मनसुख यांच्या पत्नीकडून दिलेल्या तक्रारीत करण्यात आले आहे. दरम्यान, 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्यानंतर यामध्ये बनावट नंबर प्लेट, जिलेटिन 20 कांड्या व एक धमकीचे पत्र आढळून आले होते. या संदर्भात स्कॉर्पिओ गाडी चा तपास घेतला असता ही गाडी ठाण्यातील हिरेन मनसुख या व्यक्तीच्या ताब्यात असल्याचे समोर आले होते. सचिन वझे यांनी ठाण्यातील हिरेन मनसुख यांचा जबाब नोंदवून घेतला होता. मात्र, जवाब नोंद घेतल्यानंतर केवळ दोन दिवसानंतरच मुंब्र्यातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आलेला होता.
नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सचिन वझे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली होती. सचिन वझे यांच्या विरोधात सबळ पुरावे असून कलम 201च्या अंतर्गत त्यांना अटक करावी म्हणून महाविकास आघाडीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली. मात्र, या संदर्भात एटीएस तपास करत असून सचिन वझे यांना क्राईम ब्रँचमधून बदलण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते.