मुंबईMumbai Crime News : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५ने नोकरीची आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बोगस जॉब रॅकेटचा पर्दाफाश केलाय. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने पुढील तपासात पश्चिम बंगालमधून दोन फरार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 482 पासपोर्ट जप्त करण्यात आली आहेत. पतित पबन हलदर (36) आणि मोहम्मद इलियाझ अब्दुल सत्तर शेख मन्सूरी (49) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पश्चिम बंगालमध्ये जाऊन केली दोघांना अटक : गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितलं की, नोकरीची आमिष दाखवून फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस या टोळीतील दोन मुख्य सूत्रधारांचा शोध घेत होते. दोघेही पश्चिम बंगालमध्ये असल्याची माहिती मिळताच कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन दोघांना अटक केली. गुन्हे शाखेने आरोपींकडून 482 पासपोर्ट जप्त केले आहेत. आरोपींनी नोकरी देण्याच्या नावाखाली लोकांकडून 40 ते 60 हजार रुपये घेतले होते.
आरोपी पश्चिम बंगालमध्ये लपून बसले होते: आरोपींनी लोकांकडून पैसे घेण्यासाठी एकूण २६ बँक खाती उघडल्याचे तपासात समोर आलं आहे. या खात्यात ७६ लाख रुपये आल्याचे समोर आल्यानंतर ते पोलिसांनी जप्त केले. तक्रारदार यांना ते न्यायालयाच्या आदेशानुसार परत करण्यात येणार आहेत. संपूर्ण भारतातील लोकांचे ४८२ पासपोर्ट मोहम्मद इलियाझ या आरोपीच्या मुंब्र्यातील घरातून सापडले. मुंब्रा येथील शिळफाटा परिसरात आरोपी मोहम्मद इलियाझ याने भाडे तत्वावर घर घेतले होते. हे दोन्ही आरोपी नोव्हेंबरला बोगस जॉब रॅकेटचा भांडाफोड केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लपून बसले होते. तर या गुन्ह्यात वापरलेली २६ बँक खाती जप्त करण्यात आली आहे.