मुंबई - आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या २ आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबईतील जुहू परिसरातील झेड लक्झरी रेसिडेन्सी हॉटेलवर छापा मारून ही कारवाई करण्यात आली आहे. या २ आरोपींपैकी एक जण ब्रिटिश नागरिक असल्याचे पोलीस तापासत समोर आले आहे.
आयपीएल बेटिंग प्रकरणी ब्रिटिश नागरिकासह एकाला अटक - सट्टा
आयपीएलमधील सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या २ आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोन्ही आरोपी आयपीएल सामन्यावर सट्टा स्वीकारण्यासाठी www.oceanexch1.com या वेबसाईटचा वापर करत होते.
ऋषी दर्यानानी (२३, ब्रिटिश नागरिक) आणि महेश खेमलानी (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी आयपीएल सामन्यावर सट्टा स्वीकारण्यासाठी www.oceanexch1.com या वेबसाईटचा वापर करीत होते. यासाठी कुणालाही शंका येऊ नये म्हणून ते सट्टा लावणाऱ्या व्यक्तींना आयडी व पासवर्ड देत होते. आयपीएल सिझन सुरू झाल्यापासून हे दोन्ही आरोपी आयपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये २ ते ३ दिवसांसाठी राहत होते.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जुहू येथील हॉटेलमधील रूमवर छापा मारल्यानंतर पोलिसांना सट्टा सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून ७ मोबाईल, २ लॅपटॉप, डेबिट व एटीएम कार्ड, भारतीय चलनासह यूएस डॉलर व हाँगकाँग डॉलर असा एकूण ६ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, न्यायालयाने या दोन्ही आरोपींची ६ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.